तीळगूळ घ्या गोड गोड बोला...!!

बदलत्या ऋतूंबरोबर बदलत जाणारे निसर्गाचे विभ्रम मानवी मनाला नेहमीच मोहवत आले आहेत. आपण या विभ्रमांच्या इतके मोहात पडलो की, सृष्टीचं प्रत्येक बदलतं रूप हा आपल्यासाठी उत्सवाचा ठरला आहे... नवीन वर्षाच्या आगमन झाल्यानंतर येणारी ‘मकर संक्रांती’चा सण देखील अशाच एका विभ्रमाचं रूप आहे. सा-या चराचराला संजीवनी देणा-या सूर्याचं संक्रमण साजरं करणारा हा सण. हा सण साजरं करण्याची पद्धती प्रांतागणिक जरी बदलत असली तरी तो साजरा करण्याचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही.

संक्रांत म्हटलं की गुळाची पोळी, वर तुपाचा घट्ट गोळा .. चविष्ट आणि खुसखुशीत तिळाचे लाडू आणि हलवा तर नक्कीच आठवतो नाही का? लग्नानंतर येणारा पहिला संक्रांतीचा सण जेव्हा असतो तेव्हा हा सण आपल्याकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संक्रांतीला घरी आलेल्या मुलीला, लाडक्या जावयाला घालण्यासाठी हलव्याचे दागिने करण्यासाठी एकच लगबग सुरू असते. किंवा लहानग्या नातीला किंवा नातवासाठीही हलव्याचे सुंदर दागिने तयार करून त्यांचे तीळवण करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. पूर्वी हे दागिने घरच्या-घरी तयार केले जायचे. मग आईने, मावशीनं, काकूनं मायेनं तयार केलेले संक्रांतीच्या दिवशी केल्या जाणा-या हळदीकुंकवाच्या दिवशी घातले जायचे... कालांतराने हलव्याचे दागिने घालून हळदीकुंकू साजरं करण्याची पद्धत मागं पडली होती. पण पुन्हा या सगळ्या गोष्टी मोठ्या हौसेनं साज-या केल्या जात आहेत. अर्थात काही प्रमाणात यामध्ये कालानुरूप फरक पडला आहे... जे दागिने घरी केले जायचे ते आता बाहेरून विकत आणले जातात किंवा भाड्याने आणले जाऊ लागले आहे. मात्र असे असले तरी हलव्याचे दागिने घालून संक्रांत सण साजरा करण्याच्या उत्साहात तसूभरही फरक पडलेला नाही हे विशेष...
संक्रांतीचा हा सण आप्तगण, मित्रपरिवार यांच्यातली नात्याची, मैत्रीची वीण अधिक घट्ट करतो. घरोघरी नवपरिणीत जावई-सुना तसंच छोटय़ा बाळांना हलव्याच्या दागिन्यांनी सजवून हौस केली जाते. स्वकीयांना तीळगूळ देऊन परस्परांमधले राग, द्वेष, मत्सर यांना तिलांजली द्यावी, एकमेकांशी गोड बोलत आपलं अंत:करण आणि जीवन तिळासारखं स्निग्ध ठेवावं तसंच वाणी गुळासारखी गोड असावी, असा संदेश देणारा, स्नेह संवर्धनानं जीवनात गोडवा निर्माण करणारा सण आहे.

जाता जाता एकच सांगावसं वाटतं.....
हलव्याचे दागिने, काळी साडी...
अखंड राहो तुमची जोडी
हीच शुभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी...!
तीळगूळ घ्या गोड गोड बोला...!!
काळ्या रात्रीच्या पटलावर
चांदण्यांची नक्षी चमचमते
काळुआ पोतीची चंद्रकळा
तुला फारच शोभून दिसते
तीळगूळ घ्या गोड गोड बोला...!!
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा...!

Copyright © 2012 Rane Prakashan Private Limited. All Rights Reserved.